Ad will apear here
Next
‘तुम्ही-आम्ही मिळून तापलेल्या पृथ्वीला थंड करायचंय’; तरुणीच्या कल्पनेतून वैशिष्ट्यपूर्ण अॅप विकसित
प्राची शेवगावकर

‘जागृती यात्रा’ या उपक्रमात सहभागी झालेली प्राची शेवगावकर ही तरुणी सोनम वांगचूक यांच्या भाषणाने प्रभावित झाली. त्यातूनच तिला आपला ‘ड्रीम प्रोजेक्ट’ पुढे नेण्याची प्रेरणा मिळाली. ‘कूल द ग्लोब’ हे अॅप तिने तयार केले असून, आपल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या पर्यावरणपूरक कृतीतून हरितगृह वायूंचे उत्सर्जन किती कमी झाले, याची माहिती त्यात मिळते. त्यातून आपल्या पर्यावरणपूरक कृतींना प्रोत्साहन मिळत जाईल आणि आपण सगळ्यांनी मिळून ग्लोबल वॉर्मिंगची तीव्रता कमी करायला हातभार लावू, असे तिचे म्हणणे आहे.  
..........
मी कॉलेजमध्ये असताना पहिल्यांदा क्लायमेट चेंजबद्दल (हवामानबदल) ऐकलं आणि मला वाटलं, की आपण याबद्दल काही तरी करायला हवं. माझ्या छोट्याशा वर्तुळामध्ये मी कसा बदल घडवून आणू शकते, असा विचार सुरू झाला. मी आणि बाबांनी ठरवलं, की याबद्दल नुसतं बोलून काही उपयोग नाही, आता कृतीची वेळ आली आहे. आम्ही आपल्यामुळे होत असलेलं हरितगृह वायूंचं उत्सर्जन १० टक्क्यांनी कमी करू असा निर्णय घेतला; पण त्याचं मोजमाप कसं करणार, असा प्रश्न पडला. कारण कोणत्या कृतीमधून उत्सर्जन जास्त होतं, याची काहीच कल्पना नव्हती. त्याचा अभ्यास सुरू केला. 
मी आज कार ऐवजी बसने प्रवास केला. त्यातून नक्की किती घातक वायूंचं उत्सर्जन कमी व्हायला मदत झाली? आज एसी वापरला नाही, त्यामुळे किती उत्सर्जन कमी झालं? अशा गोष्टी मोजायला सुरुवात केली. बऱ्याच वेळा उत्तर शोधून काढायला लागायचं. आमच्यासाठी तो एक गमतीचा खेळच बनला. 

मग हळूहळू आम्ही त्याचा हिशेब ठेवायला लागलो. या महिन्यात नक्की किती उत्सर्जन कमी केलं, हे समजल्यानंतर अजून प्रेरणा मिळायची. असं वाटलं, की प्रत्येकानेच स्वतःमुळे होणारं कार्बन उत्सर्जन १० टक्क्यांनी जरी कमी केलं, तरी किती तरी मोठा बदल घडून येऊ शकतो. त्यामधून अॅपची कल्पना सुचली. 

ज्याच्या मदतीने तुमच्या-माझ्यासारखी सामान्य माणसं एकत्र येतील आणि कोणत्याही सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता स्वतः परिवर्तन घडवून आणतील, असं अॅप विकसित करायचं आम्ही ठरवलं. त्यातूनच ‘कूल द ग्लोब’ या अॅपची निर्मिती झाली. (अॅपची लिंक, तसंच प्राचीचा व्हिडिओ लेखाच्या शेवटी दिला आहे.)

या अॅपबद्दल...
या अॅपमध्ये प्रत्येकाला स्वतःच्या कृतींमुळे वातावरणात सोडल्या जाणाऱ्या घातक कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करायचं मासिक ध्येय दिलं जातं. भारतात सरासरी दरडोई कार्बन उत्सर्जन १.६ टन एवढं आहे. भारतातल्या अॅप युझरला याच्या १० टक्के म्हणजे महिन्याला ३० किलो उत्सर्जन कमी करायचं उद्दिष्ट दिलं जातं. हे उद्दिष्ट देशानुसार बदलत जातं आणि युझर्स स्वतःचं टार्गेट स्वतःसुद्धा ठरवू शकतात.

मग समजा माझं ऑफिस १० किलोमीटरवर आहे. मी आज कारऐवजी बसने तो प्रवास केला, तर अॅप मला दाखवून देईल, की मी १.९ किलो कार्बन उत्सर्जन होण्यापासून वाचवलं.

मी आज दिवसभर एसी लावला नाही, तर मला समजेल, की चक्क ५.६ किलो कार्बन उत्सर्जन मी वातावरणात होण्यापासून वाचवलं.

हे सारं अॅपमध्ये मोजलं जाईल आणि आपल्या महिन्याच्या ध्येयाच्या आपण किती जवळ आलो, हे आपल्याला दिसेल. वर्षभराचं उद्दिष्टही दिलेलं असेल.

आमचा हेतू असा आहे, की हल्ली खाण्याच्या प्रत्येक पदार्थामुळे किती कॅलरीज असतात, हे लोकांना माहिती असतं. तसेच आपल्या प्रत्येक कृतीमुळे किती कार्बन उत्सर्जन होतं, याचीही माहिती असली पाहिजे.

एक माणूस असा कितीसा बदल घडवून आणणार, असं वाटू शकतं; पण जेव्हा खूप लोक एकत्र येतात, तेव्हा मोठं ध्येयसुद्धा सोपं वाटू लागतं. आम्ही ग्लोबल मीटर असं एक प्रमाण अॅपमध्ये टाकलं, ज्यामधून सगळ्यांनी मिळून किती उद्दिष्ट साध्य केलं, हे दिसू शकेल. 

सामान्य माणसाच्या हातात एक खूप मोठी ताकद आहे, हे आम्हाला यातून दाखवून द्यायचं आहे. खरा बदल, खरं परिवर्तन आपण स्वतःच घडवून आणू शकतो. ‘क्लायमेट चेंज’सारख्या मोठ्या आणि अशक्य वाटणाऱ्या प्रश्नालाही आपण सामोरं जाऊ शकतो, फक्त प्रत्येकानं आपापल्या परीने, छोटा का होईना, पण हातभार लावला पाहिजे. एकत्र येऊन आपण खूप लांबची झेप घेऊ शकतो.

या अॅपबद्दल माहिती देणारा एक छोटासा व्हिडिओ मी तयार केला आणि अगदी अनपेक्षितपणे व्हॉट्सअॅपवर तो व्हायरल झाला. लोकांचा अगदी भरभरून प्रतिसाद मिळाला. देशभरातून मेसेजेस, फोन आले. खूप जणांनी अॅप डाउनलोड केलं. नवीन वर्षाच्या आत सगळ्या अॅप युझर्सनी मिळून ५० टन कार्बन उत्सर्जन कमी करायचं, असे ध्येय आम्ही ठरवलं होतं. चे बघता बघता पूर्णही झालं. असाच प्रतिसाद कायम राहिला, तर आपलं ध्येय लवकरच गाठता येईल.

अॅप तयार करणं, ही फक्त सुरुवात आहे. मी सगळ्यांना आवाहन करते, की या उपक्रमामध्ये सहभागी व्हा. खूप मोठं उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचं आहे. दैनंदिन आयुष्यात छोटे छोटे बदल घडवून आणल्याने खूप मोठा फरक पडू शकतो, हे लोकांना समजणं महत्त्वाचं आहे. सरकारकडे नाही, कंपन्यांकडे नाही, सेलेब्रिटीजकडे नाही, तर आपल्या स्वतःच्या हातांमध्ये, आपल्या स्वतःच्या कृतींमध्ये खूप मोठी ताकद आहे, याची जाणीव झाली पाहिजे.

सामान्य माणूस आपलं दैनंदिन आयुष्य सांभाळूनही समाजकार्य कसं करू शकतो, यासाठीही एक व्यासपीठ उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या सगळ्या प्रक्रियेसाठी प्रोग्रामर्स, अॅप आणि वेब डेव्हलपर्स, कार्यकर्ते, डिझायनर्स अशा जितक्या व्यक्ती पुढे येतील, तितकं आपलं काम समृद्ध होत जाईल.

- प्राची शेवगावकर
ई-मेल : prachishe@gmail.com

(कूल द ग्लोब हे अॅप मोफत डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FVHOCT
Similar Posts
‘योजक’ शेतकरी हा बियाणं पेरण्यापासून, त्याचं रुजणं, त्याचं वाढणं, त्याचं डोलणं, असं करत करत ते पीक हाती येईपर्यंतचा सगळा प्रवास स्वतः एन्जॉय करत असतो. तो फार संवेदनशील असतो. त्यामुळे नांगरणी यंत्रांकडून हाताला जाणवणाऱ्या कंपनापेक्षा बैलाच्या पाठीवर हात मारल्यानंतरचं बैलाचं शहारणारं अंग त्याला जास्त सुखावणारं असतं
प्लास्टिकपासून ‘इकोब्रिक्स’ इकोब्रिक्स नाव ऐकून काही तरी वेगळं वाटेल; पण नागपुरात अनेक महिन्यांपासून टाकाऊ प्लास्टिकपासून ‘इकोब्रिक्स’ बनवणे सुरू आहे. जुई पांढरीपांडे आणि तिची संपूर्ण टीम हे काम करत आहे.
‘उच्च शिक्षणासाठी सामाजिक संस्थांचा हातभार महत्त्वाचा’ पुणे : ‘शेतीविषयक शिक्षणामध्ये नाविन्यपूर्ण बदल केले जात आहेत. सरकारनेही चांगल्या योजना निर्माण केल्या आहेत. शिवाय, आपल्याकडे बहुतांश विद्यार्थी मुख्य व्यवसाय शेती असलेल्या भागातून येतात. मात्र, आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे त्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचणी येतात. अशावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या
प्रत्येक गावात हवी एक वैजयंती... कोल्हापूर जिल्ह्यातील मल्लेवाडी या छोट्याशा गावातील वैजयंती पाटील ही कृषिकन्या स्वतः तर उत्तम शिकलीच; पण आता ती गावातील महिला शेतकरी आणि गटांनाही शेतीविकासासाठी मार्गदर्शन करते. एवढेच नाही, तर गावातील मुलांना वाचनाची आवड लागण्यासाठी ती वाचनालय चालवते आणि मुलांना वाचनासाठी उद्युक्त करते. तिच्या कामाची ही थोडक्यात ओळख

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language